महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या लग्नामुळे 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू - कोरोना अपडेट पुणे

लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या 25 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे कोरोना अपडेट
पुणे कोरोना अपडेट

By

Published : Aug 12, 2020, 9:03 PM IST

पुणे - अहमदनगर रस्त्यावरील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 30 जून रोजी एक शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, यासाठी दोनशेहून अधिक नागरिक उपस्थित राहिले होते. याहून धक्कादायक माहिती म्हणजे या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या 25 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून हॉटेल व्यवस्थापकासह लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली.

लॉकडाउनच्या काळात लग्न सोहळ्यात केवळ 50 जणांनाच उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, नियमांचे उल्लंघन करीत या लग्न सोहळ्यात 200 हुन अधिक नागरिक सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लग्न सोहळ्यानंतर यामध्ये उपस्थित असलेल्या पंचवीसहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. दरम्यान, शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता 25 हून अधिक नागरिक जमा करत लग्न सोहळा केल्यामुळे लग्नाच्या आयोजक आणि हॉटेल व्यवस्थापक यांच्याविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details