पुणे -संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा भारतातील सर्वात उंच 25 फुटी अश्वारूढ पुतळा पुण्यामध्ये साकारला जात आहे. हा पुतळा गनमेटल या धातूपासून बनवला जात आहे. पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे यांनी महाराजांचा हा अश्वारुढ पुतळा साकारला आहे. हा पुतळा औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे स्थापित केला जाणार आहे.
महाराजांचा सर्वात उंच पुतळ्याचा आढावा 'ही' आहेत पुतळ्याचे वैशिष्ठ्ये
हा पुतळा बनवायला दहा टन गनमेटल हा धातू लागला आहे. या धातूमध्ये 70 ते 80 टक्के तांबे असते. मुख्यत्वे पुतळे या धातूपासून बनवले जातात. या धातूपासून बनवलेले पुतळे 500 वर्षांपर्यंत सुस्थितीमध्ये राहतात. हा पुतळा साकारणाऱ्या दीपक थोपटे यांनी सांगितले, की हा 25 फुटी उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असून हे भाग्य मला लाभले आहे. त्यामुळे स्वत:ला धन्य समजतो. दीपक थोपटे हे सर जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स येथे शिल्पकला शिकले आहेकत. त्यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील प्रेरित अनेक पुतळ्यांची निर्मिती केलेली आहे. त्यामधील हा 25 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा आजपर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा असल्याचे देखील थोपटे यांनी सांगितले. गेल्या दीड वर्षापासून दीपक थोपटे हा पुतळा बनवत होते. त्यांच्या या अविरत श्रमाला योग्य असा आकार देता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
हेही वाचा -Accidental Black Spot Pune : पुण्यात अपघाताचे प्रमाण वाढले; शहरात 19 जीवघेणे 'ब्लॅक स्पॉट'