पुणे -जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात चक्रीवादळासह अवकाळी पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. यात 15 गावांमध्ये घरांसह विजेचे खांब, झाडे जमीनदोस्त झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, आदिवासी भागातील वाडीवस्त्यांवरील २५ पेक्षा जास्त कुटुंबांना रात्र अंधारात काढावी लागली.
भीमाशंकर परिसरात चक्रीवादळासह अवकाळी पावसाची बॅटिंग; घरांची पडझड - भीमाशंकर पाऊस
सोमवारी भीमाशंकर भागात चक्रीवादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये या भागातील १५ गावांमध्ये विजेचे खांब पडले, झाडे उन्मळून पडली आणि २५ पेक्षा जास्त कुटुंबांना रात्र अंधारातच काढावी लागली.
भीमाशंकर परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास चक्रीवादळ आणि विजेच्या कटकडाटसह पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या आणि सर्वत्र हाहाकार माजला. या भागातील मंदोशी, शिरगाव, टोकावडे, मोरोशी, कारकुडी, धुवोली, वांजळे, पाभे आदी परिसरात वादळी पाऊस झाल्याने घरांसह शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
कोरोना संसर्गामुळे सर्वत्र असलेल्या लॉकडाऊनमुळे आदिवासी नागरिकांना रोजगार नाही. त्यातून आता आवकाळी पावसाने सुरुवातीला घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून आदिवासी कुटुंबाला घर दुरुस्त करण्यासाठी तत्काळ मदत करण्याची मागणी सरपंच बबन गोडे यांनी केली आहे. भीमाशंकरला जाणाऱ्या मंदोशी घाटाच्या कुशीत चारही बाजूने डोंगर आहेत. या डोंगराच्या कुशीत जावळेवाडीची २५ पेक्षा जास्त कुटुंबाची आदिवासी वस्ती आहे. मंदोशीच्या जावळेवाडीवरील संकटे वर्षानुवर्षे झाली असून अद्याप तशीच आहेत. कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, कधी भूस्खलनाचा धोका तर कधी विजेचा लपंडाव, नादुरुस्त रस्ता अशा गंभीर समस्यांच्या विळख्यात जावळेवाडीतील २५ ते ३० कुटुंबे सापडली आहेत. या वाडीमधील सुमारे १५० नागरिकांना वर्षानुवर्षे या संकटांचा सामना करावा लागत आहे.