पुणे- प्राणी संग्रहालयात वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवासापेक्षाही अधिक उत्तम वातावरणात ठेवण्यात येत असल्याचा दावा नेहमीच प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र, असे असले तरी प्राणी संग्रहालयात वन्य प्राण्यांचे दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील 56 प्राणी संग्रहालयातील तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा तिसरा क्रमांक आहे.
2019-2020 सेंट्रल झू अॅथॉरिटीचा अहवाल
देशात 513 तर महाराष्ट्रात 56 प्राणिसंग्रहालय आहेत. या प्राणी संग्रहालयामध्ये हजारो प्राणी आहेत. या प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थेबाबतचा अहवाल दरवर्षी सादर करण्यात येतो. 2019-2020 चा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातून महाराष्ट्रातील संग्रहालयाचे वास्तव समोर आले आहे.
राणीच्या बागेत सर्वाधिक प्राण्यांचे मृत्यू
या अहवालानुसार मुंबई येथील जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक 67 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ वर्ध्यातील 'पीपल्स फॉर ॲनिमल' या प्राणी संग्रहालयाचा नंबर आहे. या ठिकाणी 53 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तर तिसर्या क्रमांकावर पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या वर्षभरात 35 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.