बारामती -शासनाने कृषीपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी आणलेल्या ‘कृषीपंप धोरण-२०२०’ अंतर्गत कृषी योजनेची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र सुरु आहे. कडेगाव विभागातील १९३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल ८२ लाख २२ हजार रुपये एकरकमी भरुन वीजबिल कोरे करण्याची संधी पटकावली आहे. परिणामी कृषी वसुलीत राज्यात अग्रेसर असलेल्या बारामती परिमंडलाने ५० कोट्टींचा टप्पा गाठला आहे. एकीकडे वाढीव वीजबिलामुळे ग्राहकांनी बिले भरण्यास नकार दिला असताना व विरोधी पक्षांनी या मुद्यावर रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असताना बारामती परिमंडळाची बिल वसुली कौतुकास्पद आहे.
बारामती परिमंडल राज्यात अग्रेसर -
मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वसुलीसाठी गावोगावी शेतकरी मेळावे आयोजित करत आहेत. शेतकऱ्यांना कृषी योजनेचे फायदे समजावून सांगत आहेत. परिणामी थकबाकी भरण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत. बारामती परिमंडलात पुणे जिल्ह्यातील ६ तालुके तर सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. शेतीपंपाचे एकूण ७ लाख ३६ हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे सप्टेंबर २०२० अखेर तब्बल ८ हजार १४४ कोटी थकबाकी आहे.
१९३ शेतकऱ्यांनी एकरकमी भरले ८२ लाखाचे वीजबिल.. बारामती परिमंडलाने गाठला ५० कोट्टींचा टप्पा
राज्यभर वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे कडेगाव विभागातील १९३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल ८२ लाख २२ हजार रुपये एकरकमी भरुन वीजबिल कोरे करण्याची संधी पटकावली आहे. परिणामी कृषी वसुलीत राज्यात अग्रेसर असलेल्या बारामती परिमंडलाने ५० कोट्टींचा टप्पा गाठला आहे.
कृषी धोरणांतर्गत थकबाकीचे पुनर्रगठण करुन ही थकबाकी ५ हजार ९२५ कोटी इतकी झाली आहे. त्याच्या केवळ ५० टक्के व चालू देयक असे मिळून ३ हजार २२५ कोटी इतकी रक्कम भरावयाची असल्याने शेतकरी एकरकमी थकबाकी भरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी भरलेल्या रकमेतील ३३ टक्के रक्कम गावपातळीवर व ३३ टक्के जिल्हापातळीवर वीज यंत्रणेच्या बळकटीसाठीच वापरली जाणार आहे. परिमंडलात आतापर्यंत ५० कोटींचा भरणा झाला असून बारामती परिमंडल राज्यात अग्रेसर ठरले आहे. तर केडगाव विभागांतर्गत मांडवगण फराटा व पारगाव येथे गुरुवारी (दि. ११) झालेल्या मेळाव्यात १९३ शेतकऱ्यांनी अनुक्रमे ५५ लाख ६० हजार व २५ लाख ६० हजार इतकी रक्कम भरल्यामुळे ८२ लाखांची विक्रमी वसुली झाली असून, केडगाव विभागाने वसुलीत २ कोटीची मजल मारली आहे. या सर्व शेतकऱ्यांचा कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सत्कार करत इतर शेतकऱ्यांनाही थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने, संजय मालपे यांचेसह शाखा अभियंते पप्पू पिसाळ, मतिन मुलाणी व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.