महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरगुती गॅसची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीला अटक; 77 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा पथकाने घरगुती गॅसची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. दोन कारवाईमध्ये तब्बल 77 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर एकूण 19 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

19 Man arrested for selling LPG in black market in pune
घरगुती गॅसची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीला अटक; 77 लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Jan 5, 2021, 7:42 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा पथकाने घरगुती गॅसची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. दोन कारवाईमध्ये तब्बल 77 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर एकूण 19 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आळंदी आणि म्हाळुंगे चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरगुती गॅसची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीला अटक
आळंदीतून 4 लाखांच्या गॅसच्या रिकाम्या टाक्या जप्त
आळंदीत काही जण घरगुती गॅसची चोरी करून तो सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करत असल्याची माहिती समाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार आळंदी परिसरात सापळा रचून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत दुकान मालक विलास भगवान खोडे (शिंदे), टेम्पो चालक सतिश मनोहर परबत, स्वयंभू गॅस एजन्सीचे मालक रविंद्र सातकर अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 7 हजार रुपये रोख रक्कम, सात लाख 10 हजार किंमतीचा चारचाकी टेम्पो, 4 लाख 55 हजार 226 रूपयांच्या गॅसच्या 153 रिकाम्या टाक्या, 126 गॅसने भरलेल्या टाक्या असा एकूण 11 लाख 72 हजार 366 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
15 टन कॅप्सूलमध्ये गॅस भरून काळ्या बाजारात विक्री
दुसऱ्या कारवाईत आरोपी एचपी कंपनीच्या 15 टन कॅप्सूलमध्ये गॅस भरून गॅसची चोरी करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येलवाडी परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. कारवाईमध्ये रुपेश रामदुलार गौड (वय 25, रा. चेंबुर, मुंबई), मुख्य वितरक दिनेशकुमार लेखरात विष्णोई (वय 30, रा. येलवाडी, देहू, मुळगाव जोधपूर, राजस्थान) तसेच त्यांचे इतर 15 साथीदार यांच्याविरुध्द म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
60 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त
त्यांच्याकडून 60 लाख 96 हजार किंमतीचा भरलेला कॅप्सूल गॅस टँकर, 25 लाख 85 हजार किंमतीचा एक टेम्पो, महिंद्रा पिकअप, दोन बोलेरो पिकअप, चार ॲपे, दोन छोटा हत्ती व वॅगनार अशी एकूण 10 वाहने तसेच, तीन लाख 15 हजार किंमतीच्या 184 रिकाम्या गॅस टाक्या, 1 लाख 16 हजार 030 रोख रक्कम, 1 लाख 88 हजार 700 रूपयांचे 18 मोबाईल, 12 हजार 135 रूपयांचे इलेक्ट्रीक वजन काटे व पाईप कनेक्टर असा एकूण 65 लाख 68 हजार 365 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या पथकाने केली कारवाई
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सपोनि निलेश वाघमारे, सपोनि डॉ.अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, नितीन लोंढे, संदिप गवारी, संतोष असवले, भगवंता मुठे, महेश बारकुले, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने, योगीनी कचरे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रशांत सोरटे, सचिन नागरे, होमगार्ड मयुर ढोरे यांनी केली.


ABOUT THE AUTHOR

...view details