पुणे :एच3 एन2च्या एकूण रूग्णांपैकी 149 रुग्ण बरे झाले आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा 13 आहे. 13 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. बाकीचे 7 जण हे वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 67 वर्षीय एका संशयित रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. शहरात महापालिकेचे 120 स्वॅप सेंटर असून येथे संशयित रुग्णाच्या घशातील स्त्रवाचे नमुने घेऊन, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात येतात. या अगोदर शहरामध्ये 22 रुग्ण आढळले होते. ही संख्या आता 162 झाली आहे.
मृत्यूचे ऑडिट न झाल्याने अस्पष्टता :खाजगी रुग्णालयात 7 रूग्ण दाखल झाले आहेत. तर दोघेजण 6 वर्षाच्या आतील मुले आहेत. 4 जण 60 ते 81 या वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आहेत. मृत्यू झालेल्या 67 वर्षीय बाधित पुरुषावर कसबा पेठमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला इतर आजार म्हणजेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्याचा 11 मार्च रोजी मृत्यू झाला. मृत्यूचे ऑडिट न झाल्याने स्पष्टता नाही.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन : पुणे महानगरपालिकेकडून याची तयारी करण्यात आली आहे. सध्या बाणेर येथील रुग्णालयात 200 बेड, तर डॉक्टर नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 बेड उपलब्ध केले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अद्याप डेथ ऑडिट अहवाल बाकी आहे. त्याला इतर आजार होते. विषाणूचा प्रसार होत असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेचे साथरोग अधिकारी डॉक्टर सूर्यकांत देवकर यांनी केले आहे. महापालिकेच्या तयारीची ही माहिती सूर्यकांत देवकर यांनी दिलेली आहे. जानेवारीमध्ये 27 रूग्ण, मार्चमध्ये 89 रूग्ण तर मार्चमध्ये 46 रूग्ण अशी आकडेवारी आहे.