पुणे :दिवसेंदिवस कारागृहामध्येच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. असाच एक प्रकार येरवडा मध्यवर्ती कारागृहात समोर आलेला आहे. सोमवारी सकाळी 10 ते साडे दहा वाजल्याच्या सुमारास यातील न्यायबंदी 1 ते 16 यांनी त्यांच्यात असलेल्या पूर्ववैमनस्यातून तसेच वर्षस्वर्वेदातुन आप-आपसात एकमेकांना दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण करीत जखमी केले आहे. या आधी देखील दोन महिन्यांपूर्वी चार ते पाच जणांमध्ये देखील अशीच कारागृहात मारहाणीची घटना घडली होती.
कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह : या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश शंताराम देव, प्रणय अर्जुन रणधिर, विजय वीरधर, सचिन दळवी, मुकेश साळुंके, गणेश वाघमारे, आदित्य चौधरी, किरण गालफडे, सुरज रणदिव, आकाश शिनगारे, विशाल खरात, रुपेश आखाडे, रोहित जुजगर, शुभम राठोड, अनुराग कांबळे, महेबुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याचे लैंगिक शोषण केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे आता कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कैद्यांचा कारागृह रक्षकांवर हल्ला :काही दिवसांपूर्वी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बॅरेक का चेंज केले? असा सवाल या पोलीस कर्मचाऱ्याने या कैद्यांना केल्याने या कैद्यांनी प्रभू चरण पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. खुनाच्या गुन्ह्यातील या आरोपींनी ही मारहाण केली होती. गंंभीर गुन्ह्यांतील कैद्यांनी कारागृह रक्षकांवरच हल्ला चढवल्याची घटना समाेर आली होती. 10 ते 12 कैद्यांनी हा हल्ला चढविला होता. या घटनेअगोदर 1 महिन्यांपूर्वीच पुण्यातील येरवडा कारागृहातून हे कैदी नाशिकला आणण्यात आले हाेते.