पुणे -पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. बुधवारी दिवसभरात एकट्या पुणे शहरात कोरोनाचे 152 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ससून रुग्णालयातील 9 आणि इतर रुग्णालयातील पाच जणांचा समावेश आहे. यामध्ये ११ पुरूष, तर तीन महिला आहेत.
पुण्यात दिवसभरात १५२ कोरोनाबाधितांची नोंद, तर 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू - पुणे कोरोनाधितांचा आकडा
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चार हजारांच्या घरात पोहोचला असून त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत चालली आहे.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 3899 रुग्ण सापडले आहेत. यापैकी उपचारानंतर बरे झालेल्या 2023 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 1656 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 220 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 600 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाचशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत.