पुणे :राज्यात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज बारावीचा गणित विषयाचा पेपर होता. मात्र, हा पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर झाल्यामुळे परीक्षा आयोजित करणाऱ्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गणिताचा पेपर पुन्हा होणार नाही : महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, 'पेपर फुटला असे मी म्हणणार नाही. गणिताचा पेपर कधी व्हायरल झाला ते तपासावे लागेल'. या संपूर्ण प्रकणाची तपासणी केली जाईल, या पुढे पेपर व्हायरल होणार नाही याची काळची घेतली जाईल असे गोसावी म्हणाले. आज सकाळी 10 वाजाच्या सुमारास पेपर फुटल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना अकरा वाजता पेपर दिला जाणार होता. मात्र, त्या आगोदरच पेपर व्हायरल झाल्याने विरोधी पक्षाने देखील सरकारव ताशेरे आढेले आहेत.
पोलिस यंत्रणेमार्फत तपास : बारावीचा गणिताचा पेपर फुटीची तपासणी करण्यात येणार आहे. गणित विषयाच्या पेपरची 2 पाने समाज माध्यमावर व्हायरल झाली आहेत. ती कोणी केली? त्यामागे त्यांचा काय हेतु होता? यामागे रॅकेट आहे का? याची तपासणी पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे.या प्रकरणात सहभागी विद्यार्थ्यांसह इतर संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती गोसावी यांनी ईटीव्हीशी बोलतांना दिली.