पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर सद्या प्रचंड ताण आहे. अशात पिंपरी-चिंचवड शहरात मे महिन्यात नऊ तर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोन खून झालेले आहेत. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. बहुतांश खून हे दारू प्राशन केल्यानंतर झालेल्या भांडणातून, झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शहरात सरासरी आठवड्याला तीन खून होत आहेत. ही बाब गंभीर असून ते रोखण्याचे आव्हान पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले तेव्हा शहरात गुन्हेगारी अत्यल्प दिसली. त्यात दारु दुकानावरील नियम शिथिल करत दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर शहरात खुनाचे सत्र सुरू झाले. मे महिन्यात तर जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेले खून हे बहुतांश दारू प्राशन केल्यानंतर झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खुनाची कारणे पूर्व वैमनस्य, प्रेम प्रकरण, विवाहबाह्य संबंध, घरगुती वाद आणि टोळी वर्चस्व ही आहेत.