बारामती (पुणे) -रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बारामती तालुक्यात पंचायत समिती व तहसील कार्यालय स्तरावर १ कोटी ३६ लाख ८८ हजार ३८० रूपयांची कामे सुरू आहेत. या माध्यमातून ६१० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. बारामती तालुक्यात रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या कामांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मजुरांना मजुरी मिळवून देऊन याचे योग्य नियोजन झाल्यास ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलविण्याची ताकत या योजनेत आहे. हे बारामती तालुक्याच्या रोजगार हमी योजना विभागाने दाखवून दिले आहे. त्यामुळे सार्वजनिक कामात विकासाची गंगा ठरु शकणाऱ्या या योजनेकडे शहरी मजुरांचा देखील मोर्चा वळू लागला आहे.
५१ कामे तालुक्यात सुरू
केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक मजूराला किमान २३८ रुपये मजुरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरूपानुसार या मजुरीमध्ये वाढ देखील होते. बारामती तालुक्यातील रस्ता, घरकुल, सिंचन विहीर, कुक्कुटपालन या पंचायत स्तरावरील कामे सुरू आहेत. तर तहसील स्तरावरील रेशीम विकास तुती लागवड अंतर्गत तीन वर्ष मुदतीची काम सुरू आहे, अशी माहिती रोजगार हमी विभाग पंचायत समिती बारामतीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहन पवार यांनी दिली.
तालुक्यात सध्या ३७ गावांमधून १२५ कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू आहेत. रोजगार हमीच्या वैैयक्तिक लाभाच्या योजनांना तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून सध्या रेशीम उत्पादन व तुती लागवडीची २२ व फळबागा लागवडीची ५१ कामे तालुक्यात सुरू असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
बारामती तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कामाची सद्यस्थिती