सिंधुदुर्ग :Transgender teacher : जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून प्रवीण वारंग यांनी विद्यादान करण्यास सुरुवात केली. मात्र आता त्या ट्रान्सजेंडर शिक्षिका रिया आळवेकर म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता गवसही यांनाही त्यांचा अभिमान आहे.
शारीरिक बदल शस्त्रक्रिया : 2012 मध्ये शिक्षक म्हणून शिक्षकी पेशात आलेल्या प्रवीण वारंग यांना लहानपणापासूनच आपण स्त्री आणि पुरुष नसून, आपण तिसरे कोणी आहोत असं वाटत होतं. "ज्यावेळी शिक्षकी पेशात आले, त्यावेळी हार्मोन्स बदल आणि शारीरिक बदलाची जाणीव होऊ लागली. मात्र, 2017 मध्ये आपण शारीरिक बदल शस्त्रक्रिया केली आणि हार्मोन्स ट्रीटमेंट केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं मला समाजात ट्रान्सजेंडर शिक्षिका म्हणून वावरता आलं" असं रिया आळवेकर म्हणाल्या.
स्वीय सहायक म्हणून, तात्पुरत्या स्वरुपात काम : "2019 नंतर लिंग बदल शस्त्रक्रिया झाली. मात्र, सर्व शासकीय दस्तऐवज बदलणं गरजेचं असल्यानं मला काही काळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी त्यांच्या दालनात स्वीय सहायक म्हणून, तात्पुरत्या स्वरुपात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यावर 23 ऑगस्ट 2022 पासून कुडाळ तालुक्यातील ओरोस येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नं. १ मध्ये मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे" असंही त्या म्हणाल्या.
जीवनावर चित्रपट येणार : प्रशालेतील मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षक, विद्यार्थी या सर्वांनाच रिया आळवेकर यांच्या जिद्दीची, कामाची भुरळ पडली आहे. विद्यार्थीही रिया आळवेकर या शिक्षिकेच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा करत यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडं रिया आळवेकर यांनी बोलताना सांगितलं, "माझे आई-वडील तसंच समाजाला मला समजण्यात थोडा वेळ गेला. मात्र, आता सर्व चांगलं असून समाजानं मला दिलेल्या स्थानाबद्दल सर्वांचे मी आभार मानते." भविष्यात ट्रान्सजेंडर शिक्षिका रिया आळवेकर यांच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याचंही येथील संगीता पाटयेकर या शिक्षिकेनं सांगितलं.