परभणी- कोरोना या संसर्गजन्य आजाराने महाराष्ट्राबरोबर संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी १ कोटी १ लाख रुपयांची मदत केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा कोरोनाग्रस्तांना 'आधार'; दिली एक कोटींची मदत
जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी १ कोटी १ लाख रुपयांची मदत केली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हे 1 दिवसांचे वेतन असून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करणारी परभणी जिल्हा परिषद ही सद्यस्थितीत महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना पहिल्या टप्प्यात 91 लाख 67 हजार 364 एवढा आणि दुसऱ्या टप्प्यात 9 लाख 32 हजार 636 असा एकूण एक कोटी 1 लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हे 1 दिवसांचे वेतन असून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करणारी परभणी जिल्हा परिषद ही सद्यस्थितीत महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. तसेच परभणी जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वेच्छेने 750 अन्नधान्य संच, 150 आरोग्य संचाचे वाटप केले आहे.
शिवाय कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाईक यांना जीवनावश्यक वस्तू व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मदत निधी देताना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आदींची उपस्थिती होती.