वसई- नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवनजवळील मुंबई-अहमदाबाद महार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यात खड्डे आहे की, खड्ड्यात रस्ता आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यास खड्ड्यांचा अंदाज न आल्याने लहान मोठे अपघात होत आहे. यामुळे हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे.
नालासोपारा-पेल्हार रस्ता बनला मृत्यूचा सापळा
नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवनजवळील मुंबई-अहमदाबाद महार्गावर मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
धानीव बाग येथे पहिल्याच पावसात रस्त्यात खड्डा पडला होता. तो त्यापेक्षा मोठा होत चालला आहे. हा रस्ता एमएमआरडीएने बनवला होता. त्याचे पालकत्व आता येथील सार्वजनीक बांधकाम खात्याकडे आहे. या खड्डेमय रस्त्याकडे बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांना खड्ड्यातून वाट काढत जावे लागत आहे. त्याचबरोबर या खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी येथील नागरीक करत आहेत.