परभणी- परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आज शनिवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 2 रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 पर्यंत पोहोचली आहे. त्यात परभणी शहरातील जुना पेडगाव भागातील एका मुलीचा तर जिंतूर तालुक्यातील सांवगी भांबळे येथील एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. दरम्यान, परजिल्ह्यातील कुटुंबीयांच्या अधिकृत तसेच अनाधिकृतपणे प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूरपर्यंत पसरला आहे.
परभणीत मध्यरात्री आलेल्या अहवालात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या 22 वर... - परभणीत रुग्णांच्या संख्येत वाढ
चालू आठवड्यात दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे परभणी जिल्ह्यातील रहिवाशांची धाकधूक वाढली आहे. आज मध्यरात्रीदेखील दोन नवे रुग्ण आढळून आले असून, त्यानुसार जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांमध्ये परभणी शहरातील एक तर जिंतूर तालुक्यातील भांबळे सावंगी या गावतील एका रुग्णाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे चालू आठवड्यात प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरूवारी रात्री शहरातील दोन व ग्रामीण भागातील दोन असे 4 संशयीत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्याआधी बुधवारी सर्वाधिक 9 रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले. त्या आधीच्या दोन दिवसांत प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यात आता शनिवारी मध्यरात्री आणखीन 2 रुग्णांची भर पडली. त्यानुसार रुग्णांची संख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी एक रुग्ण ठणठणीत बरा होऊन परतला आहे, तर उर्वरित 21 रुग्णांवर परभणीच्या जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. मात्र असे असले तरी या रुग्णांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, मुंबई, औरंगाबाद या रेडझोन मधून येणाऱ्या लोकांचे लोंढे अजूनही कायम आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा भागात अधिक सतर्कतेने तपासण्या करून कोरोनाग्रस्तांना त्या ठिकाणीच रोखणे किंवा तेथून परत पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा शहरात तसेच गावांमध्ये दाखल होणारे हे रुग्ण इतरांसाठी धोकादायक ठरत आहे.