महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेती आधारित उद्योगांच्या ऑनलाईन यशोगाथा; 'लॉकडाऊन'मध्ये परभणी कृषी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम - VNMKV webinar for Entrepreneur

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने शेतकरी, विद्यार्थी आणि शेती प्रक्रियेतील नवउद्योजकांसाठी 'वेबिनार'च्या माध्यमातून 'यशस्वी उद्योजकांच्या ऑनलाईन यशोगाथा' हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 31 जुलैपर्यंत चालणाऱ्या या वेबिनारचे उद्घाटन सोमवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले.

VNMKV
परभणी कृषी विद्यापाठ

By

Published : Jul 28, 2020, 6:00 PM IST

परभणी -कोरोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांचे शैक्षणिक उपक्रम ठप्प झाले आहेत. मात्र, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने शेतकरी, विद्यार्थी आणि शेती प्रक्रियेतील नवउद्योजकांसाठी 'वेबिनार'च्या माध्यमातून 'यशस्वी उद्योजकांच्या ऑनलाईन यशोगाथा' हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती आधारित उद्योग प्रक्रियेमध्ये असलेली संधी, त्यात येणाऱ्या अडचणी यावर आठवडाभर मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राज्यातील व देशातीलच नव्हे तर परदेशातील शेतकरी, नवउद्योजक आणि विद्यार्थी देखील सहभाग घेणार आहेत.

'लॉकडाऊन'मध्ये परभणी कृषी विद्यापाठाचा अनोखा उपक्रम

एरवी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विद्यापीठांना लॉकडाऊनमुळे अनेक बंधने आली आहेत. विद्यार्थ्यांना देखील घरी पाठवून देण्यात आल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान मिळत रहावे आणि शेतीवर आधारित नवउद्योजकांना प्रेरित करण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे 'कृषी प्रक्रिया उद्योजकांच्या यशोगाथा' या विषयावर एका आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. 31 जुलैपर्यंत चालणाऱ्या या वेबिनारचे उद्घाटन सोमवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले.

संपूर्ण आठवडाभर ऑनलाईन वेबिनार चालणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतीवर आधारित उद्योग चालवणारे यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करत आहेत. याचा फायदा नवउद्योजक, विद्यार्थी, प्रगतिशील शेतकऱ्यांना व महिला उद्योजकांना होणार आहे. या वेबिनारसाठी झूम अॅप्लिकेशनच्या माध्यमातून 2 हजार 200 जण जोडले गेले आहेत. तर हजारो लोक युट्यूबवर हा कार्यक्रम पाहून मार्गदर्शन मिळवत आहेत. या ऑनलाईन कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शेतीवर आधारित 14 यशस्वी उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. हे उद्योजक उद्योगातील संधी, उभारणीची प्रक्रिया आणि येणाऱ्या अडचणी यावर मार्गदर्शन करत आहेत, अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या अन्न व तंत्र विभागाचे प्राध्यापक डॉ.आर.बी. क्षीरसागर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

या वेबिनारच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवउद्योजक तयार करण्याचा विद्यापीठा उद्देश आहे. महिलांनी लघुउद्योग तयार करावेत, यासाठीही या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये परभणी कृषी विद्यापीठाचा हा एकमेव कार्यक्रम असून, याचा फायदा महाराष्ट्रातील तसेच देशातील आणि परदेशातील नवउद्योजक आणि विद्यार्थी देखील घेत आहेत. प्रामुख्याने पीक काढणी पश्चातील तंत्रज्ञान, उद्योग उभारणी, त्यात येणाऱ्या अडचणी, उत्पादित मालाची ऑनलाईन विक्री कशी करावी, मूल्यवर्धक उत्पादन कसे करता येईल, त्यासाठीचे पूर्व तंत्रज्ञान आणि महिलांचा सहभाग कसा असेल? यावर यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करत आहेत.

या ऑनलाईन वेबिनारसाठी दोन ते अडीच हजार लोकांची नोंदणी झाली आहे. तर एक हजार लोक झूम अ‌ॅप्लिकेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग नोंदवत आहेत. यातून नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळेल, असे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details