परभणी- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बीज संशोधन केंद्राच्या इमारतीला आज शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी सहयोगी अधिष्ठाता यांचे दालन सापडले असून, संपूर्ण दालन जळून खाक झाले आहे. या आगीचा भडका प्रयोग शाळेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन ही आग आटोक्यात आणल्याने मोठी आर्थिक हानी टळली.
परभणीतील कृषी विद्यापीठातील बीज पैदास केंद्राच्या इमारतीला आग; सहयोगी अधिष्ठात्यांचे दालन जळून खाक
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.बेग यांचे दालन आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाने आग वेळीच आटोक्यात आणल्याने जवळ असणारी प्रयोगशाळा आणि इतर कक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले नाहीत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या रेल्वेगेट जवळ असलेल्या बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार बियाणे विभागाच्या या इमारतीला मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. कार्यालयीन कर्मचारी सकाळी कार्यालय उघडण्यासाठी आले असता, इमारतीच्या खिडक्यांमधून धूर निघत होता. त्यानंतर कार्यालय उघडताच आगीचा मोठा भडका उडाला. ज्यामध्ये इमारतीच्या पुढील बाजूस असलेली सहयोगी अधिष्ठाता डॉ. बेग यांचे दालन पूर्णतः जळून खाक झाले आहे.
विशेष म्हणजे या दालनाच्या बाजूलाच सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. सुदैवाने या आगीच्या घेऱ्यात प्रयोगशाळा आली नाही. त्यामुळे मोठी आर्थिक हानी टळली. शिवाय मागील बाजूस इतर कर्मचाऱ्यांचे, विभाग प्रमुखांचे तसेच प्राध्यापकांचे स्वतंत्र दालन असून त्यापर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच अग्निशमन दलाने येऊन ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.