परभणी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी यांत्रिकीकरण दिनानिमित्त बहुउपयोगी कृषी अवजारे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी येथे शेतकरी मेळावाही पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास शेतकऱ्यांसह कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात कुलगुरूंसह कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, उद्घाटनपर भाषणात बोलताना कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, वाढती शेतमजुरी आणि हंगामात मजुरांची कमतरता यामुळे पीक लागवडीचा एकूण खर्च वाढत आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. मात्र, अल्पभूधारक, मध्यम आणि मोठे भूधारक शेतकरी यांची कृषी अवजारे आणि यंत्राची गरज वेगवेगळी आहे. कृषी यांत्रिकीकरणामुळे पीक लागवडीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे शक्य आहे. कृषी यांत्रिकीकरणाकरिता कृषी यंत्र उद्योजक, शेतकरी आणि कृषी अभियंते यांच्यात समन्वयाची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, परभणी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. के. आर. सराफ, प्राचार्य डॉ.धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ.यु एम खोडके, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकऱ्यांच्या आणि विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या समन्वयातून कृषी यांत्रिकीकरणाची चळवळ गतिमान झाली पाहिजे, असे सांगितले. तर शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण बळकट करून उन्नतीसाधावी असे मत आत्मा प्रकल्प संचालक के. आर. सराफ यांनी व्यक्त केले.