परभणी- राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या परभणीतील 'हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क' यांच्या ऊरुस यात्रेला प्रारंभ झाला आहे. तब्बल 113 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेला राज्यभरातून भाविक येतात. पुढील 15 दिवस या यात्रेची रेलचेल राहणार आहे. यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. विशेष म्हणजे सर्व धर्मांतील लोक हा उरूस हर्षोल्हासात साजरा करतात.
भाविकांच्या नवसाला तुरंत पावणारा देव, अशी ख्याती असल्याने परभणीतील हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या दर्ग्याला तुरुतपीर बाबा यांचा दर्गा म्हणून ओळखले जाते. तुरुतपीर बाबा यांच्या ऊरूस यात्रेला मानाच्या संदलाने सुरवात झाली. या माध्यमातून जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी मानाची गलफ डोक्यावर घेऊन तुरुतपीर बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवली. त्यानंतर रविवारी प्रत्यक्ष उरुस यात्रेला सुरुवात झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह वफ्क बोर्डाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या मानाच्या संदलची शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा - परभणीत फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; संपूर्ण दुकान जळून खाक
या वर्षी 31 जानेवारीपासूनच यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. या यात्रेनिमित्त 2 फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनासह पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, एसटी महामंडळ व इतर काही कामगार संघटनांच्या वतीने देखील संदल काढून हजरत सय्यद शहा तुराबुल हक यांच्या दर्ग्यावर चादर चढवली जाते.