परभणी - गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला तथा पाथरीरोडला वसमतरोडशी शहराबाहेरून जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित बायपास रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांना दिली आहे. यासंदर्भात खासदार जाधव यांनी डिसेंबर महिन्यात गडकरी यांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भात गडकरी यांनी खासदार जाधवांना ही माहिती कळविली.
कल्याण ते निर्मल हा केंद्रीय महामार्ग परभणी जिल्ह्यातून जातो. या मार्गाची निर्मिती मागील १० वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे; परंतु या मार्गाचे काम परभणीच्या मानवतरोड पर्यंत येऊन थांबले आहे. तसेच परभणी शहराजवळ या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने होत आहे. त्यात शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासचे काम ठप्पच आहे। ज्यामुळे शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक होत असून, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यासंदर्भात खासदार संजय जाधव यांनी मानवत ते नसरतपूर (ता.वसमत) या राष्ट्रीय महामार्गासाठी व परभणी बायपास (बाह्य वळण) रस्त्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता. या संदर्भात त्यांनी ८ डिसेंबर २०१९ रोजी गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून सदर राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व विस्तारीकरण तथा बायपास रस्त्याच्या संदर्भात निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गडकरी यांनी नुकतेच खासदार संजय जाधव यांना एक पत्र पाठवले असून, या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे त्यात नमूद केले आहे. बायपास रस्त्याची एकूण लांबी १७.५ कि.मी. असून त्यापैकी ८.५ कि.मी. रस्ता चार पदरी तर ९ कि. मी. रस्ता दोन पदरी समाविष्ट असल्याचे या पत्रात म्हटले आहे.