परभणी- संचारबंदीत पुण्यातून दुचाकीवर मूळगावी परतलेल्या क्वारंटाईन कुटुंबातील २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जिंतूर तालुक्यातील सोस-जोगवाडा येथे सोमवारी घडली आहे. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील सर्वांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच चिमुकल्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हे स्पष्ट होणार आहे.
मजुरीच्या निमित्ताने सोस-जोगवाड्याचे कुटुंब पुण्यातील भोसरी येथे राहते. मात्र संचारबंदीमुळे ते कुटुंब 14 मे रोजी दुचाकीने गावी परतले होते. मात्र गावकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर या कुटुंबाला जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. परंतु दोन दिवस जिल्हा परिषद शाळेत राहिल्यानंतर त्या कुटुंबीयाने स्वतःच्या घरात क्वारंटाईन होण्याची इच्छा दर्शविली. त्यानंतर ते घरीच क्वारंटाईन झाले. या दरम्यान सोमवारी या कुटुंबातील 2 वर्षांच्या चिमुकल्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला गावातील आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत जोगवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिंतूरला घेऊन जाण्यास सांगितले.