परभणी - जिंतूर तालुक्यात कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या २ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच मानमोडी येथे धारधार शस्त्रांनी तरुणावर हल्ला झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
जिंतूर तालुक्यात एकाच दिवशी २ दुर्दैवी घटना; तलावात बुडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू - करण निकाळजे
परभणी जिल्ह्यात तलावात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या घटनेत तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथे इयत्ता तिसरीत शिकणारा करण सुभाष निकाळजे (८) हा मामाच्या गावाला सुट्ट्यांसाठी आला होता. यावेळी तो मंठा येथील पवन दिलीप आढे (१४) याच्यासोबत कुऱ्हाडी शिवारातील तलावात दुपारी ३ वाजता पोहण्याकरता गेला. मात्र, पोहताना दोघांचे पाय गाळात अडकल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शेळी पालन करणाऱ्या मुलीने ग्रामस्थांना सांगितल्यानंतर नारायण इंझे, राम काजळे, दामोदर घुगे, लक्ष्मण काजळे, केशव इंझे आणि केशव इंझे यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बामणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड आणि जमादार मेकेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दुसऱ्या घटनेत जिंतूर तालुक्यातील मानमोडी येथील युवकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. संदीप सोपानराव घुले (२२) असे या तरुणाचे नाव आहे. या युवकास रक्तस्त्राव झाल्यामुळे जिंतूर शासकीय रुग्णालयात तपासणी करून त्यास संध्याकाळी परभणी येथे हलवण्यात आले आहे. याबाबत उशिरापर्यंत पोलिसात तक्रार दाखल नव्हती.