महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन्ही लाचखोर पोलीस अखेर शरण; गंगाखेडच्या कोठडीत रवानगी

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० जून रोजी सायंकाळी गंगाखेड-परळी रोडवर सापळा रचला होता. मात्र, या ठिकाणी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच घेवून दोन्ही पोलीस कर्मचारी कारने परळीकडे पळून गेले होते.

लाचखोर पोलीसांना अटक

By

Published : Jul 7, 2019, 11:36 AM IST

परभणी- गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करणारे दोन पोलीस कर्मचारी पोलिसांना शरण आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. मात्र, शनिवारी ते गंगाखेड पोलिसांना शरण आले असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती एसीबीने शनिवारी रात्री दिली.

लाचखोर पोलीसांना अटक

पोलीस उपनिरिक्षक विश्वनाथ गिते व पोलीस शिपाई गौतम भालेराव असे, या दोन पोलिसांची नावे आहेत. गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करणार्‍या एका जेसीबीला पकडून ते वाहन सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच या दोघांनी मागीतली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु, लाचलुचपत विभागाने रचलेल्या सापळ्या दरम्यान हे दोन्ही पोलीस घटनास्थळावरून पळून गेले होते. तेव्हापासून ते फरार होते.

दोन्ही कर्मचारी सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असून त्यांच्या विरोधात २० जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती. याबरोबरच खासगी व्यावसायिक लक्ष्मण फड याने तक्रारदारास लाचेची रक्कम देवून प्रकरण मिटवून टाका, असे प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले होते.

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० जून रोजी सायंकाळी गंगाखेड-परळी रोडवर सापळा रचला होता. मात्र, या ठिकाणी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच घेवून ते कारने परळीकडे पळून गेले होते. त्यांच्या विरूध्द गंगाखेड पोलीस ठाण्यात कलम ७, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींनी गंगाखेड न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांचा जामीन ३ जुलै रोजी फेटाळल्याने पीएसआय बाबू गिते व गौतम भालेराव हे दोघे शनिवारी परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर झाले होते.

दोघांना अटक करण्यात आली असून गंगाखेड न्यायालय हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधिक्षक एन. जे. शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर यांच्या पथकाने यशस्वी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details