परभणी - तालुक्यातील दोन ठिकाणी आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहे. पहिल्या घटनेत साडेगाव येथील तरुणाने मुल होत नसल्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत झरी येथील व्यक्तीने यकृताच्या आजाराला कंटाळून जीवन संपवले. या दोन्ही प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साडेगाव येथील तरुणाच्या लग्नाला अनेक वर्षे झाले तरी मुल होत नव्हते. याच नैराश्यातून त्याने विषारी औषध पिल्याचे सांगण्यात येत आहे. माणिक गणेशराव मोरे (वय 33) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो सतत तणावात राहत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. याच तणावातून त्याने बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास विषारी औषध पिले, त्याला तात्काळ परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत त्याचे काका दौलत शंकरराव मोरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.