परभणी - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच आता मृत्यूदर देखील वाढत चालला आहे. शनिवारची (18जुलै) सकाळ परभणीकरांना धक्का देणारी ठरली. परभणी आणि गंगाखेड शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता 12 एवढी झाली आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने साडेतीनशेचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी सकाळीच प्राप्त अहवालानुसार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात परभणी शहरातील मुमताज नगर भागातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना 13 जुलै रोजी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रमाणेच गंगाखेड येथील 53 वर्षीय पुरुष रुग्णाचा देखील रात्री उशिरा मृत्यू झाला. त्यांना 14 जुलै रोजी दाखल केले होते. या दोन्ही रुग्णांना मधुमेहासह इतर काही आजार असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण, त्यांनी उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोना बाधीत झाल्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू नांदेड येथे उपचारादरम्यान झाला आहे, तर उर्वरित दहा जण परभणी जिल्हा रुग्णालयातील कोरोना संक्रमित कक्षात दगावले आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत कोरोनाबाधित मृत रुग्ण इतर गंभीर आजाराने त्रस्त होते. त्या आजारांवरही त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर ते मरण पावले आहेत. आतापर्यंत केवळ कोरोनाचे लक्षण आढळून आलेला एकही रुग्ण परभणी जिल्ह्यात मरण पावलेला नाही.