परभणी - शहरात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत उपयोगी ठरेल, अशा दोन खुल्या व्यायामशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात आणि शहरातील राजगोपालचारी उद्यानात उभारण्यात आलेल्या या व्यायामशाळेचे उद्घाटन शनिवारी आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरालगत असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सकाळी उठून फिरायला (मॉर्निंगवॉकला) जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, परंतु फिरण्यासोबतच लोकांना व्यायामाची सोय उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मुंबईच्या धर्तीवर परभणीत देखील खुल्या व्यायामशाळांची संकल्पना काही महिन्यांपूर्वी मांडली होती. त्यादृष्टीने या व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या खुल्या व्यायामशाळेमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत उपयोगी ठरतील अशा व्यायामाच्या साहित्याचा समावेश आहे. काल शनिवारी सकाळी सहा वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत या खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संध्याकाळी परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यानातील खुल्या व्यायामशाळांचे उद्घाटन करण्यात आले आहे.