परभणी- शहरातून दोन पिस्तूल जप्त केल्याच्या पाठोपाठ पाथरीतून अवघ्या काही तासातच आणखी एक पिस्तूल जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पाथरी येथील एकता नगरातील एका जीममधून पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि.24) पिस्तूल जप्त केली.
पहाटे पेट्रोलिंगच्या दरम्यान केली कारवाई
पोलिसांचे एक पथक पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्या पथकास एक गुप्त माहिती कळाली. सय्यद चाऊस मोहमद चाऊस (रा. अजीज मोहल्ला, पाथरी) हा व्यक्ती विनापरवाना बेकायशीरपणे पिस्तूल बाळगून असल्याचे कळाले. लागलीच या पथकाने पहाटे पाच वाजता चाऊस याच्या अजीज मोहल्यातील घरावर छापा टाकला. त्या 26 वर्षीय युवकास ताब्यात घेऊन विचारपुस सुरू केली. तेव्हा त्याने एकाता नगरातील त्याच्या मालकीच्या जीममध्ये पिस्तूल ठेवल्याची माहिती दिली. पथकाने तातडीने जीममध्ये जात तेथील सिल्व्हर रंगाचे पिस्तूल जप्त केले.
परभणीतूनच खरेदी केले पिस्तूल
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने ही पिस्तूल परभणीतील ओमकार उर्फ सोनू पांचाळ या व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी त्याच्यासह अन्य आरोपीविरूध्द पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात 40 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी रात्री केले होते 2 पिस्तूल जप्त
पोलिसांनी मंगळवारी (दि. 23) रात्री परभणी शहरातील साखला प्लॉट भागा छापा टाकून दोन गावठी पिस्तूल, 13 जीवंत काडतूस तसेच चरस व गांजाचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत 3 आरोपी अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण 6 लाख 41 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर काही तासातच (पहाटे) ही कारवाई झाल्याने परभणी जिल्ह्यात गावठी पिस्तूल विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्याद्वारे पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा -परभणी जिल्हा बँक निवडणूक : 85 उमेदवारी अर्ज वैध; बोर्डीकर, दुराणी बिनविरोध