परभणी - शहरातील व्यापाऱ्यांना कोरोनाची तपासणी केल्यानंतरच आपली दुकाने उघडता येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनाने 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती; मात्र यानंतरही अनेक व्यापाऱ्यांनी अद्याप तपासण्या केलेल्या नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांना या तपासणीसाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तोपर्यंत तपासणी करून घ्यावी; अन्यथा तपासणी केल्याशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत, असा आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावला आहे.
परभणी महापालिकेच्यावतीने शहरातील 6 ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या शिबिरांच्या माध्यमातून 328 व्यापाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये 22 व्यापारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर 306 जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
ज्यामध्ये सिटी क्लब सभागृहात 50 व्यापाऱ्यांची तपासणी झाली, तर गांधीपार्कातील उद्देश्वर विद्यालययात 52, कल्याण नगर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात 97, नवा मोंढ्यातील रोकड हनुमान मंदिर सभागृहात 30, अपना कॉर्नर येथील वाचनालयात 19 आणि वकील कॉलनीतील औषधी भवनात 80 अशा एकूण 328 व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात 306 निगेटीव्ह तर 22 व्यापारी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात सिटी क्लब सभागृहातील तपासणीत 2, उद्देश्वर विद्यालय गांधी पार्क 7, आयएमए हॉल 9, रोकड हनुमान मंदिर 1, वाचनालय 1 व औषधी भवन वकील कॉलनीतील 2 जणांचा समावेश आहे.
या चाचणी केंद्र ठिकाणी आयुक्त देविदास पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. या शिबिरासाठी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, सहाय्यक आयुक्त वाघमारे, शिवाजी सरनाईक, सुधाकर किंगरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद आदीजन परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, शहरातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड 19 आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व आरोग्य विभाग, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, भाजी व फळ विक्रेते किराणा व्यापारी, शहरातील व्यापारी, संशयित नागरिक, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क नागरिक खासगी दवाखान्यामधून संदर्भीत केलेले संशयित रुग्ण आदींची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेण्याकरिता हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून औषधे निर्माते, डॉक्टर, प्रयोगशाळा तज्ञ, सहाय्यक एएनएम यांची नियुक्ती केली आहे.
"आजपासून 16 ठिकाणी होणार तपासणी"
आज शनिवार (15 ऑगस्ट) पाासून शहरातील 16 ठिकाणी हे तपासणी केंद्र सुरू केले जाणार आहेत. यातून शहरातील व्यापारी, फळविक्रेते, मटन मार्केट,मच्छी मार्केट यांनी तपासणी होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात केलेल्या आवाहनानुसार महापालिका क्षेत्रात सर्व व्यापारी, भाजी विक्रेते आणि मटन विक्रेत्यांची तपासणी होणे, अनिवार्य आहे. त्यामुळे दोन दिवसांची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. त्यानुसार 17 ऑगस्टपर्यंत शहरातील नियमित 6 ठिकाणांसह इतर 10 ठिकाणांवर देखील तपासणी होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.