परभणी -शहरातील जिल्हा कारागृहात काल शुक्रवारपासून कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये काल 61 कैदी कोरोनाबाधित आढळून आले. त्यानंतर आज (शनिवारी) उर्वरित कैद्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, ज्यात आणखी 23 कैद्यांच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यशिवाय शहरातील कोतवाली पोलीस ठाणे आणि पोलीस महामार्ग शाखेतील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
परभणी शहर महानगरपालिकेकडून जिल्हा कारागृहात कैद्यांची काल (शुक्रवारी) 351 कैदांची रॅपीड अॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 61 जण पॉझिटिव्ह आढळले. या शिवाय शहरातील 14 केंद्रांवर 345 व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 6 जण पॉझिटिव्ह आढळले. शहरात व कारागृहात मिळून एकूण 696 जणांची तपासणी करण्यात आली, ज्यात 629 निगेटिव्ह तर 67 पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर आज (शनिवार) देखील जिल्हा कारागृहात रॅपीड अँटिजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी 96 कैद्यांच्या तपासण्या पार पडल्या, ज्यातील 23 कैद्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे.
जिल्हा पोलीस दलात देखील कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील दोन डझनहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कोरोनाशी दोन हात करत आहेत. प्रत्येक नाका आणि चौकीवर पोलीस कर्मचारी उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहेत. यावेळी त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तपासण्या करत असताना पोलिसांना कुठलीही सुरक्षा नाही. केवळ तोंडाला मास्क बांधून हे पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. याचा परिणाम पोलीस दलात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.
यापूर्वी परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे, नानलपेठ, जिंतूर तालुक्यातील बोरी, पाथरी, मानवत, सोनपेठ आदी ठिकाणचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर आज परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा तसेच महामार्ग शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. विशेष म्हणजे कोतवाली पोलीस ठाण्यात आढळलेल्या कर्मचार्याच्या संपर्कात पाच सहकारी आले असून, महामार्ग पोलीस दलात कार्यरत असलेल्या बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात चार कर्मचारी आले आहेत. या सर्व 9 कर्मचाऱ्यांना आता क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
महापालिकेकडून परभणी शहरातील 14 केंद्रांवर तसेच जिल्हा कारागृहात देखील रॅपिड अँटिजन तपासण्या करण्यात येत आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांसह व्यापारी, फळ-भाजी विक्रेते, पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यासाठी स्वतः आयुक्त देविदास पवार लक्ष ठेवून आहेत, तर सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी, डॉ. ऋतुजा मगर, डॉ.ऋषिकेश चाळक, डॉ.ताई ढोबळे आदींसह प्रयोगशाळा तज्ञ अजहर मोहम्मद जावेद, अक्षय शिंदे, सुनीन भदरगे, मुरली समींद्रे, दत्ता शिंदे आदी प्रयत्न करत आहेेत.