परभणी - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर, आज(मंगळवार) संभाव्य रुग्णांपैकी 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही परभणीकरांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. तर, सध्यस्थितीत रुग्णालयात चार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
परभणी जिल्हा रुग्णालयाला आज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालापैकी 20 संभाव्य रुग्णांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत संभाव्य रुग्णांची संख्या 2 हजार 539 झाली असून, त्यापैकी 2 हजार 504 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 80 स्वॅबचा अहवाल अनिर्णायक आला आहे. तसेच, 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचा अभिप्राय प्रयोगशाळेकडून आला आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 93 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 86 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. आता कोरोनासाठी उभारण्यात आलेल्या स्वतंत्र रुग्णालयात अवघे चार कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.