परभणी - आजपर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 14 रुग्ण रविवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील 11 तर परभणीतील 2 आणि सेलूच्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यानुसार परभणीत कोरोनाबाधितांची संख्या 36 वर गेली आहे. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, एक ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे. त्यामुळे आता 34 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
रविवारी दिवसभर नांदेडच्या प्रयोगशाळेतून परभणीत एकही पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह असा कुठलाच अहवाल प्राप्त झाला नव्हता. ज्यामुळे समाधान व्यक्त होत होते. गेल्या आठ दिवसांपासून दररोज कोरोनाबाधितांची खबर मिळत होती. रविवारी एक दिवस आनंदात जाईल असे वाटत असतानाच झाले उलटेच. आजपर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबधितांची खबर रविवारी परभणीत येऊन धडकली. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. या बाधितांमध्ये गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील तब्बल 11 रुग्ण असून, परभणी शहरातील पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक 19 मधील एक तर परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील एक आणि सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, यापूर्वी परभणी जिल्ह्यात 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यापैकी जिंतूर तालुक्यातील एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. त्यानंतर 20 रुग्ण कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यामध्ये आता या 14 रुग्णांची भर पडली आहे. त्यानुसार आता उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 34 एवढी झाली आहे.