परभणी -जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढलेला कोरोनाचा संसर्ग आता कमी होताना दिसत आहे. आज शनिवारी 67 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 283 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा मृत्यूदर देखील कमी झाला असून, गेल्या 24 तासांत केवळ 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात 3 हजार 501 सक्रिय रुग्ण
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 हजार 781 वर पोहोचली असून, त्यातील 45 हजार 56 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3 हजार 501 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्यात वाढलेला कोरोनाबधितांचा आकडा मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कमी होत गेला. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 200 च्या आत आहे. आज तर हा आकडा 100 च्या देखील खाली आहे. शनिवारी नव्या 67 रुग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 283 जणांनी कोरोनावर मात केली आहे.