परभणी -जिल्ह्यात एप्रिल महिन्यात प्रचंड वेगाने वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या मे महिन्यात मात्र आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. आज सोमवारी जिल्ह्यात 280 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून नव्याने आढळणाऱ्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज 650 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 46 हजार 448 वर पोहोचली असून, त्यापैकी 42 हजार 655 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनानाचे 2 हजार 652 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान 1 मेपासून आजपर्यंत दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या काळात नव्याने 9 हजार 522 बाधित आढळले, तर 14 हजार 524 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या घटली
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्याच प्रमाणात घटतानाही दिसून येत आहेत. आज सोमवारी 280 नवीन बाधित आढळले, तर 650 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासांत 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांच्या कोरोना कक्षात 2 हजार 652 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 141 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 2 लाख 78 हजार 31 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू
दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात 9 पुरुष तर 1 महिलेचा समावेश आहे. यात 4 रुग्णांचा मृत्यू हा जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये झाला आहे. जिल्हा रुग्णालयात 2, जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये 1 तर खासगी रुग्णालयात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -रत्नागिरीत घरांवर झाडे कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान