परभणी- शहरात लुटमारीच्या 3 वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यामधील पहिल्या घटनेत पेट्रोल पंपाच्या मॅनेजरवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्याच्या जवळचे दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. दुसर्या घटनेत सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करणाऱ्या कारागिराने मालकाचे 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. तर तिसऱ्या घटनेत रामकृष्ण नगरात दोन ठगां ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून पळ काढला. या तीनही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि. 22 जून) एकाच दिवशी उघडकीस आलेल्या या घटनांमुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला लुटले
परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिकुलाल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. यामध्ये सोमवारी (दि. 21 जून) रात्री 11 वाजता नेहमीप्रमाणे व्यवस्थापक शेख सत्तार शेख नबी हे पेट्रोलची विक्री करून जमा झालेले दीड लाख रुपये एका बॅगमध्ये भरून मालकाच्या घरी घेऊन जात होते. पेट्रोल पंपाच्या समोरील नालीवर ते उभे असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी तिपप्पलवाड तपास करत आहेत.
महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून भामटे पसार
शहरातील रामकृष्ण नगर भागात राहणाऱ्या दमयंती सुनील दुबे या 62 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 22 जून) नवामोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी प्रमाणे, सोमवारी (दि. 21 जून) सकाळी साडेसहा वाजता घरासमोर गायीला नैवेद्य देत होत्या. त्याचवेळी मोटरसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून दोन चकरा मारल्या. दुसऱ्या चकरेत त्यातील एकाने यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली आणि गाडीवर बसून पोबारा केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक धावून आले. मात्र, तोपर्यंत चोरटे त्या ठिकाणाहून पसार झाले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर करत आहेत.