परभणी- दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परभणी शहरातील 3 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील 5 ठिकाणच्या 5 व्यक्तींना त्यांच्या घरी होम-क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांच्या 'स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, परभणीत अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. पण, दिल्लीच्या कार्यक्रमात जाऊन आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करण्यात आल्याने आल्याने परभणीकरांची चिंता वाढली आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्यामुळे चिंता अधिक प्रमाणात आहे. असे असले तरी परभणीत मात्र अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेला नाही. परंतु कालच दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुस्लीम भाविकांना मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आल्याने देशात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे परभणी शहरातील तीन जण या जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ते तिघे जण परभणीत 13 मार्च रोजी आले आहेत. त्या व्यक्तींना परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांच्या घरून ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.