परभणी - अवैध वाहतूक, चालक परवाना आणि इतर कागदपत्रांच्या तपासणीसाठी गेल्या आठवड्यात प्रादेशिक परिवहन विभागाने मोहीम उघडून परभणीतील शेकडो ऑटो पकडले. हे ऑटो एसटी महामंडळाच्या गंगाखेड रोडवरील कार्यशाळेत लावण्यात आले. मात्र, या ठिकाणी अनेक ऑटोमधील बॅटरी, टेपरेकॉर्डर आणि पेट्रोल मोठ्या प्रमाणात गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला असून यात अनेक गरीब ऑटोचालकांना भुर्दंड बसत आहे.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा 14 ऑगस्टला परभणी दौरा झाला होता. मात्र, त्याच दिवसापासून कागदपत्र तपासणीच्या नावाखाली प्रादेशिक परिवहन विभागाने ऑटो पकडण्याची मोहीम सुरू केली. यामध्ये पहिल्या २-३ दिवसात ३५० पेक्षा अधिक ऑटो पकडून ते एसटी महामंडळाच्या गंगाखेड रोडवरील कार्यशाळेच्या आवारात लावण्यात आले आहेत. त्यानंतर २०० ते ८ हजार रुपयांपर्यंत दंडाची रक्कम भरून ऑटोचालक ऑटो सोडवून नेत आहेत. परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आपल्या ऑटोमधील विविध सामान चोरीला गेल्याचे लक्षात येत आहे. बहुतांश ऑटोमधून चालकाच्या सीटखाली असलेली बॅटरी काढून घेतल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच अनेक ऑटोमधून टेपरेकॉर्डर आणि साउंड बॉक्स काढण्यात आले आहेत. शिवाय बहुतांश ऑटोमधील पेट्रोल काढून घेतल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत. याबद्दल ऑटोचालक संताप व्यक्त करत असून 'आमच्या चोरीला गेलेल्या वस्तू तात्काळ मिळवून द्या, अशी मागणी ते एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे करत आहेत.