परभणी - शहरातील कारेगाव रस्त्यावरील श्रीरामनगरात आज दिवाळीच्या पहाटेच चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 7 हजार रुपये रोख, टीव्ही आणि सोन्याचे दागीने असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या हाती फारसे धागेदोरे लागले नाहीत.
श्रीराम नगरातील रहिवाशी योगेश पांचाळ हे कुटुंबीयांसह 2 नोव्हेंबरला पुण्याला गेले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ते परत आले. घराचा दरवाजा उघडाच असल्याचे पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने नवामोंढा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर येऊन पाहणी केली. तसेच तपासाला सुरुवात करत श्वान पथकासही घटनास्थळावर पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, पांचाळ यांच्या घरास कालपर्यंत कुलूप असल्याची माहिती दिली. त्यावरून ही चोरीची घटना शनिवारी पहाटेच्या सुामारास झाली असल्याचे स्पष्ट झाले.