महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत आणखी एका 'क्वॉरंटाइन' कुटुंबीयांच्या घरात चोरी; 20 लाखांचा ऐवज लंपास - परभणी क्राईम न्यूज

रहेमतनगरातील शालीमार सभागृहाजवळ एकजण कोरोनाबाधित आढळल्याने त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर घरातील अन्य सदस्य 24 ऑगस्टपासून शेजारीच राहत असलेल्या नातेवाईकाकडे होम क्वॉरंटाइन झाले होते. मात्र, बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास होम क्वॉरंटाइन झालेले लोक घरी आल्यानंतर, त्यांना घर उघडे दिसले. त्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी स्वयंपाक घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले.

parbhani theft news  parbhani latest news  parbhani crime news  परभणी चोरी न्यूज  परभणी क्राईम न्यूज  परभणी लेटेस्ट न्यूज
परभणीत आणखी एका 'क्वॉरंटाइन' कुटुंबीयांच्या घरात चोरी

By

Published : Aug 28, 2020, 6:29 AM IST

परभणी - शहरातील जिंतूर रोडवरील रहेमतनगरात कोरोनामुळे क्वॉरंटाइन केलेल्या एका कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी तब्बल 19 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आज (गुरुवारी) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील परभणी शहरात क्वॉरंटाइन केलेल्या दोन कुटुंबांच्या घरांमध्ये चोरट्यांनी हात साफ केला, तर जिल्ह्यातील गंगाखेड, सेलू, पाथरी आणि जिंतूर याठिकाणी देखील अशा घटना घडल्या आहेत.

रहेमतनगरातील शालीमार सभागृहाजवळ एकजण कोरोनाबाधित आढळल्याने त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर घरातील अन्य सदस्य 24 ऑगस्टपासून शेजारीच राहत असलेल्या नातेवाईकाकडे होम क्वॉरंटाइन झाले होते. मात्र, बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास होम क्वॉरंटाइन झालेले लोक घरी आल्यानंतर, त्यांना घर उघडे दिसले. त्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी स्वयंपाक घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. घरातील लोखंडी तिजोरीतील रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, फौजदार साईनाथ पुयड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. त्यानंतर आज (गुरुवारी) नानलपेठ पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी चोरीची तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, सर्वजण 24 ते 26 ऑगस्ट या काळात घरास कुलूप लावून बाहेर पडले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत लोखंडी तिजोरीतील नगदी 10 लाख रुपये व 9 लाख 91 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास फौजदार साईनाथ पुयड हे करीत आहेत.

दरम्यान, यापूर्वी परभणी शहरात स्टेशन रोडवरील एका क्वॉरंटाइन केलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी असाच हात साफ केला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी शहरातील व्यंकटेश नगरात चोरट्यांनी क्वॉरंटाइन केलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी करत 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला, तर अशाच काही घटना गंगाखेड, सेलू आणि पाथरी तसेच जिंतूर शहरातदेखील घडल्या आहेत. या ठिकाणी क्वॉरंटाइन केलेल्या कुटुंबीयांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील किंमती साहित्य, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने क्वॉरंटाइन केलेल्या कुटुंबीयांच्या घरांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details