परभणी- रुंदीकरणाच्या कामासाठी २०१७ पासून परभणी-जिंतूर राज्यमार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. हे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने पावसाळ्यात हा राज्यमार्ग चिखलमय होतो. त्यामुळे वाहने घसरून दररोज लहान-मोठे अपघात घडत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. धर्मपुरी, टाकळी, नांदापूर या गावादरम्यानच्या रस्त्यावर वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत असून, या चिखलमय रस्त्यावरून अनेक वाहने घसरत आहेत, तसेच वाहन चिखलात रुतुन बसत असल्याच्याही घटना समोर येत आहेत.
परभणी-जिंतूर या 42 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कंत्राटदाराने मुळचा डांबरी रस्ता खोदून ठेवला. 20 सप्टेंबर, 2017 रोजी सुरू झालेले हे काम 2019 मध्ये पूर्ण करायचे होते. त्यावर एकूण 212 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात अजूनही या रस्त्याचे काम रेंगाळलेलेच आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा झाडे कापण्यात आली आहेत. त्यानंतर दुतर्फा मोठमोठ्या मशिनद्वारे खोदकाम करून मुरूमासह खडीने भराव टाकण्याचे काम सुरू केले. त्यावेळी रस्त्याचे काम वेळे अधिच पूर्ण होईल, असे वाटत होते. पण, कंत्राटदारास काही आजी-माजी लोकप्रतिनिधींनी त्रास दिल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून एकमेकांवर झाले. कदाचित ही बाब सत्य असेल म्हणून संबंधीत कंत्राटदाराने हे काम अजुनही पूर्ण केले नाही.