परभणी- गोरगरीब आणि अज्ञानी लोकांच्या शासकीय कामांची कागदपत्रे त्यांच्या दारापर्यंत जाऊन देण्यासाठी 'शासन आपल्या दारी, आमदार आपल्या दारी' हा उपक्रम परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सुरू केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत सहा शिबिरे घेऊन तब्बल सहा ते साडेसहा हजार लोकांना रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र व इतर शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून देण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या काळात सर्वच प्रभागांमध्ये हे शिबिर घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी आमदार पाटील यांनी दिली.
'शासन आपल्या दारी, आमदार आपल्या दारी' उपक्रम विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी स्मार्ट कार्डची योजना आणली आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात वृद्धांची गर्दी होत आहे. या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याने वयोवृद्ध लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी याच शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठीचे स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी पाटील यांनी दिली.
शहरातील गंगाखेड रोडवर असलेल्या माहेर मंगल कार्यालय बुधवारी हे शिबीर पार पडले. गेल्या काही दिवसात अशा प्रकारची सहा शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून राशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, सातबारा, खासरापत्र, पेरा प्रमाणपत्र, श्रावण बाळ योजना, निराधार योजना, पंतप्रधान आवास योजना तसेच इतर योजनांसाठी लागणाऱ्या शासकीय कागदपत्रांची पूर्तता त्यांच्या प्रभागात जाऊन करून देण्यात येत आहे. या ठिकाणी संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन कामे करून ही यंत्रणा थेट तहसील तसेच संबंधित विभागासोबत जोडण्यात आली आहे. ज्यामुळे या ठिकाणी होणारी कामे त्या-त्या कार्यालयातून पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे शासन आपल्या दारी या योजनेचा परभणीत खरोखरच प्रत्यय येत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार पाटील म्हणाले, 'सध्या शासनाच्या कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जवळपास पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. ज्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. अनेक वेळा विविध बैठकांमध्ये जाणारे अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांना त्या कार्यालयात जाऊन सुद्धा त्यांची कामे होत नाहीत. त्यामुळे 'शासन आपल्या दारी, आमदार आपल्या दारी' या उपक्रमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचवून जनतेची शासकीय कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
आतापर्यंत आमच्या शिबिरातून साडेसहा हजार लोकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात सर्वच प्रभागांमध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा अशी शिबिरे घेऊन लोकांची कामे केली जातील. शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही आमदार पाटील म्हणाले. यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, नगरसेवक प्रशास ठाकुर, सुशील कांबळे, संभानाथ काळे, उद्धव मोहिते, बाबू फुलपगार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.