परभणी - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीचा जोर वाढला आहे. काल जिल्ह्याचे तापमान केवळ ११ अंश सेल्सिअस एवढे निचांकी नोंदवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, २०१८ साली डिसेंबर महिन्यात केवळ २ अंश सेल्सिअस एवढे निचांकी तापमान नोंदवण्यात आले होते. यंदा देखील तापमानाची घसरण महिनाभर आधीच झाली असून, परिणामी या वर्षीचा हिवाळा हुडहुडी भरवणारा ठरणार आहे.
साधारणपणे नोव्हेंबर महिन्यानंतर थंडी पडू लागते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून परभणीत अचानक थंडीचा जोर वाढला आहे. साधारणपणे या दिवसांमध्ये १५ ते २० अंश या दरम्यान किमान तापमानाची नोंद होत असते. परंतु, यंदा हे तापमान ११ अंशापर्यंत खाली आले आहे, तर आज १२.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या पुढील काळात देखील तापमान घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
वाढत्या थंडीवर ला-निनोचा प्रभाव
मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कदाचित यावेळी थंडीचा जोर लवकर निर्माण झाल्याचा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात अतिवृष्टीमुळे ही थंडी वाढली नसून, या थंडीवर 'ला-निनो' या नैसर्गिक प्रक्रियेचा प्रभाव असल्याचे परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले.