महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळू माफियांवर कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला तलाठी - collector

कोण आहे रे तुम्ही म्हणत खंडू पुजारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. सुरक्षारक्षकाने धाव घेत तलाठ्याला पकडले. सुरक्षारक्षकाने जिल्हाधिकाऱ्यांची ओळख सांगताच तलाठी पळून जावू लागला.

जिल्हाधिकारी पी. शिवशंकर आणि तलाठी

By

Published : May 27, 2019, 6:39 PM IST

परभणी- अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी जात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर तलाठी धावून गेल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिसांनी तलाठ्याला अटक केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय , परभणी

परभणी जिल्ह्यातील गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रविवारी रात्री ते जात होते. मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास मोटारसायकलवर (एमएच २२ एआर २२०७) तलाठी खंडू बाबुराव पुजारी (राहणार रिधोरा, तालुका वसमत) हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कारच्या पाठीमागे येत होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाहन थांबवून सदरील व्यक्तीची चौकशी करण्यास सुरक्षारक्षकास सांगितले.

या कारवाईवेळी जिल्हाधिकारीही वाहनातून खाली उतरले होते. यावेळी सुरक्षारक्षकाने बॅटरीचा प्रकाश मारला असता, कोण आहे रे तुम्ही म्हणत खंडू पुजारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. सुरक्षारक्षकाने धाव घेत तलाठ्याला पकडले. सुरक्षारक्षकाने जिल्हाधिकाऱ्यांची ओळख सांगताच तलाठी पळून जावू लागला. सुरक्षारक्षकाने त्याला पकडून पूर्णा पोलीस ठाण्यात आणले. याबाबत वाहन चालक नंदकिशोर शेलाटे यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पूर्णा पोलिसांनी तलाठ्याला आज (सोमवार) दुपारी अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details