परभणी -वीज बिलांच्या देयकांबाबत वीज मंडळाचा अजब कारभार वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. वीजजोडणी करण्यापूर्वीच बिले देण्याचे प्रकार नेहमीच घडतात. अशा प्रकारांची दखल मात्र कार्यालयाकडून सहजासहजी घेतली जात नाही. याला कुठेतरी चाप बसावा म्हणून आज (मंगळवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणीच्या अधीक्षक अभियंता एस. आर. अन्नछत्रे यांच्या दालनात भाकरी खात अनोखे ठिय्या आंदोलन केले.
8 दिवसांपूर्वी दिली होती तक्रार
या संदर्भात गोळेगाव (ता. पूर्णा) येथील शेतकरी संभाजी प्रल्हाद दूधाटे, गोदावरी देवराव गायकवाड, गोविंद तुकाराम दुधाटे यांच्या वीज पुरवठ्याबाबतच्या कोटेशनची कागदपत्रे घेऊन गोळेगाव येथील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी वीज मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय गाठले. विशेष म्हणजे झालेल्या प्रकाराबाबत 8 दिवसांपूर्वीच अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती. मात्र, तरीही कनिष्ठ अभियंत्यांनी या प्रकरणात कुठलीच कार्यवाही केली नव्हती.