परभणी- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर आलेल्या अतिवृष्टीच्या मदतीचे तसेच पीक विम्याचे पैसे काढता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याला जिल्हा बँकेचे व्यवस्थापन कारणीभूत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेत आंदोलन केले. तसेच तत्काळ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे काढता यावेत, अशी मागणी यावेळी शेतकरी संघटनेने केली आहे.
हेही वाचा -परभणीत 'सामान्यज्ञान' परीक्षेत 28 कॉपीबहाद्दर निलंबीत
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामार्फत अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे उपलब्ध झाले आहेत. मात्र, बँक खात्यातील ही त्यांची स्वतःची रक्कम त्यांना काढणे अवघड झाले आहे. कारण बँक प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रत्येक शाखेत शेतकऱ्यांच्या भल्यामोठ्या रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातील बँकांमध्ये दुपारनंतर पैसे पोहोचतात. मात्र, शेतकरी सकाळपासूनच रांगेत उभा असतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे सकाळीच संबंधित शाखेमध्ये पोहोचले पाहिजेत. सध्या लग्नसराई आहे, शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या खात्यावरील पैसे एटीएमच्या माध्यमातून काढता यायला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर अनेक दिवसांपासून बँकेचे एटीएम बंद पडले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.