महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत सहाय्यक अभियंत्याचे जिल्हाधिकाऱयांकडून निलंबन - परभणी

परभणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी निवडणूक कामासाठी नेमून दिलेली सेवा न बजावता गैरहजर राहणाऱ्या जलसंधारण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याचे थेट निलंबन केले आहे.

परभणीत सहाय्यक अभियंत्याचे जिल्हाधिकाऱयांकडून निलंबन

By

Published : Apr 3, 2019, 10:50 PM IST

परभणी- परभणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी निवडणूक कामासाठी नेमून दिलेली सेवा न बजावता गैरहजर राहणाऱ्या जलसंधारण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याचे थेट निलंबन केले आहे. शिवाय त्यांच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

पी. बी. कच्छवा असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. ते मृदा व जलसंधारण उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मतदान केंद्राध्यक्ष आणि बैठे पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती दिली होती. मात्र, कच्छवा यांनी २० मार्च रोजी वैद्यकीय रजेची मागणी केली होती. परंतु रजेच्या मागणी पत्रावर त्यांची स्वाक्षरी नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाने त्यांची रजा मंजूर केली नव्हती, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. शिवाय त्यांनी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले नाही, यावरून कच्छवा यांनी आजारी असल्याचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनधिकृतपणे कार्यालयात गैरहजर राहून निवडणुकीचे काम केले नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. या बाबीवरून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिवाय याबाबत विद्यमान प्रभारी उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांनीदेखील संगणमत केल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. त्यामुळे त्या कार्यालयप्रमुखावरदेखील अधिनियम १९५१ कलम १३४ नुसार नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील असंख्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. परंतु निलंबनाची कारवाई प्रथमच केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details