महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत ऊसतोड कामगाराचा अपहरण करून खून; दोघांना अटक

कधी-कधी किरकोळ वादातून एखाद्याचाही जीवही जातो. परभणी तालुक्यातील गव्हा गावामध्ये उचल घेतलेल्या पैशामुळे एका ऊसतोड मजूराचा खून झाल्याचे समोर आले आहे.

Murder
खून

By

Published : Dec 22, 2020, 9:11 AM IST

परभणी - 'ऊस तोडणीसाठी घेतलेली उचल (पैसे) परत कर, अन्यथा आताच ऊस तोडणीला चल', असे म्हणत परभणी तालुक्यातील गव्हा येथे एका कामगाराचे मुकादमांनी
अपहरण करत खून केल्याची घटना घडली. या कामगाराला मारहाण करून जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिले होते. तपासाची चक्रे वेगात फिरवून ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

परभणीत ऊसतोड कामगाराच्या खूनाबाबत माहिती देताना पोलीस

या संदर्भात गव्हा येथील अक्षय उत्तमराव खरात यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याप्रमाणे गजानन चांदु काळे (रा. साळापुरी तांडा), राजू पवार, उत्तम गोरखनाथ काळे (रा. गव्हा) अन्य एका व्यक्तीने मंगळवारी रात्री फिर्यादीचे वडील उत्तम नागोराव खरात यांना ऊस तोडणीसाठी आत्ताच चल, असे म्हणत जबरदस्ती उचलून नेले होते.

जायकवाडीच्या डाव्या कालव्यात मृतदेह आला वाहून -

या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जायकवाडीच्या डाव्या कालव्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह वाहून आल्याचे दिसले. नवामोढा पोलिसांनी पंचनामा करत मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी तो मृतदेह उत्तम खरात यांचा असल्याचे व ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक गणेश राहिरे व फौजदार भगवान जाधव यांनी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दाखवला व ओळख पटवली.

पाथरी रस्त्यावर मारहाण करून कालव्यात फेकले -

उत्तम खरात यांना आरोपींनी पाथरी रस्त्यावर जबर मारहाण करत जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी गजानन चांदु काळे (रा. साळापुरी तांडा), व उत्तम गोरखनाथ काळे (रा. गव्हा) या दोघांना अटक केली. ज्या मोटर सायकलवर उत्तम खरात यांना नेले होते, ती मोटरसायकलही जप्त केली असून, अटक केलेल्या दोघांनीही खुनाची कबूली दिली आहे. तसेच अन्य दोन आरोपी देखील लवकरच अटक होतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details