परभणी- शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवनावर अज्ञातांकडून दगडफेकीची घटना घडली. या हल्लेखोरांनी इमारतीच्या काचांवर दगडफेक केल्याने पक्षाच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. शिवसेनेचे परभणीतील खासदार संजय जाधव यांनी काल (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत राजीनामा दिला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर रात्री उशिरा ही घटना घडल्याने राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे.
परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर रात्री उशिराच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ही दगडफेक केली. यामध्ये इमारतीच्या समोरच्या बाजूला असलेल्या काचांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुपारपासूनच, जिल्ह्यातील राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. दरम्यान, जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवला आहे. त्या पत्रात त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला झुकते माप मिळत आहे. शिवसैनिकांना डावलले जात आहे. राष्ट्रवादीमुळे शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचे आरोप केला आहेत. त्यामुळेच ही दगडफेकीची घटना त्याचेच पडसाद असल्याची चर्चा आहे.
काही तरुण मोटरसायकलवर आले आणि त्यांनी दगडफेक केली आहे. या घटनेची माहिती समजताच नवामोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दिली असून, रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.