परभणी - पीक विम्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आणली. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होईल, त्यांना नुकसानीचा मोबदला मिळेल, असे ठरवले होते. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या योजनेची अंमलबजावणी करत असताना लावलेले निकष हे शेतकऱ्यांच्या विरोधातील आहेत. विमा कंपन्यांना नफा कसा मिळेल, यासाठी हे निकष लावले आहेत. त्यामुळे राज्य सरकार विमा कंपन्यांचे दलाल म्हणून काम करत असल्याचा आरोप भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी केला. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी परभणीतील आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या अडचणी केंद्राकडे पाठविणार -
दरम्यान, भाजपच्या वतीने किसान मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यात येत आहेत. त्यांना विविध योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या अडचणी देखील जाणून घेत आहोत. तसेच केंद्र सरकार बाबत राज्यातील शेतकऱ्यांचे काय मत आहे, हे देखील आम्ही या अभियानाच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. शेतकऱ्यांच्या या अडचणी, प्रश्न तसेच शेतकऱ्यांचे मत केंद्राकडे पाठवून येणाऱ्या काळात ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी वासुदेव काळे म्हणाले.