परभणी -जिल्ह्यातील ५६ पैकी ४७ केंद्रांवर शुक्रवारी बारावीचा हिंदी विषयाचा पेपर पार पडला. यासाठी ६ हजार ५२९ पैकी ६ हजार २७८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून २५१ विद्यार्थी गैरहजर होते. दरम्यान, गुरूवारी इंग्रजी विषयाच्या पेपरला बैठ्या आणि भरारी पथकाने कडक कारवाई करत ५ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना बडतर्फ केले. त्याचा परिणाम आजच्या परिक्षेत दिसून आला. त्यामुळे आज एकही कॉपी बहाद्दर आढळून आला नाही.
परभणी जिल्ह्यात 12 वीच्या परिक्षेसाठी ५६ बैठे ३३ भरारी पथके नियुक्त
जिल्ह्यातील ५६ पैकी ४७ केंद्रांवर शुक्रवारी बारावीचा हिंदी विषयाचा पेपर पार पडला. यासाठी ६ हजार ५२९ पैकी ६ हजार २७८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून २५१ विद्यार्थी गैरहजर होते.
जिल्ह्यात यंदा २४ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी १२वीच्या परिक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी गुरूवारी २३ हजार ४६८ जणांनी इंग्रजी विषयाची परिक्षा दिली. यात ८०० विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. पहिल्याच दिवशी ५ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, शिक्षण विभागासह महसूल प्रशासनाने परिक्षा केंद्रांवर पर्यवेक्षकांची नियुक्ती, बैठे आणि भरारी पथकांची स्थापना केली आहे.
यासाठी १ हजार ४५६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रांवर ५६ बैठे पथक आहेत. ३३ भरारी पथके ही केंद्रांवर भेटी देऊन पाहणी करत आहेत. दरम्यान, ऐनवेळी ४ परिक्षा केंद्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केल्याने पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला होता.
शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील परिक्षा केंद्रांवर परिक्षेसाठी पाठवण्यात आले. यात पेडगाव परिक्षा केंद्रावर तब्बल १२०० विद्यार्थी तर टाकळी कु., इसाद, महातपूरी, धानोरा आदी परिक्षा केंद्रावर ६०० विद्यार्थी बसवण्यात आले आहेत. यामागे मात्र, कोणतेही ठोस कारण देण्यात आले नाही. शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयात परिक्षार्थींना सामावून घेण्याची क्षमता असताना देखील ऐनवेळी परिक्षा मंडळाने गतवर्षी वादग्रस्त ठरलेल्या परिक्षा केंद्रांवर परीक्षार्थी पाठवल्याने काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.